T20 World Cup 2024 : निकोलस पूरनची स्फोटक फलंदाजी; युवराज सिंगच्या ‘या’ मोठ्या विक्रमाची केली बरोबरी…

T20 World Cup 2024 (WI vs AFG) : टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात मंगळवारी गटातील शेवटचा सामना झाला. टी-20 विश्वचषक 2024 चा 40 वा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकांत सर्वबाद 114 धावांवर गारद झाला आणि यासह वेस्ट इंडिजने हा सामना 104 धावांनी जिंकला.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने स्फोटक कामगिरी केली. त्याने विरोधी संघाविरुद्ध 53 चेंडूत 98 धावांची दमदार खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि आठ षटकार आले. त्याचे अवघ्या दोन धावांनी शतक हुकले. तो नर्व्हस 90 चे बळी ठरला. याशिवाय त्याने एका षटकात 36 धावा काढत युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
T20 World Cup 2024 : लॉकी फर्ग्युसनची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी…
अशाप्रकारे एका षटकात 36 धावा झाल्या….
अफगाण संघाकडून अजमतुल्लाह उमरजईने चौथे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार मारला गेला. त्यामुळे अजमतुल्लाह उमरजई दडपणाखाली आला आणि त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला, जो चौकार गेला. अशाप्रकारे, षटकात फक्त एक लीगल चेंडू झाला आणि अझमतुल्लाहने तोपर्यंत 16 धावा दिल्या होत्या. ओव्हरच्या दुसऱ्या लीगल चेंडूवर फ्री हिट असतानाही एकही धाव झाली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले गेले. तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार हा लेगबाय स्वरूपातून आला होता. फलंदाज निकोलस पुरनने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकले. अशा प्रकारे या षटकात एकूण 36 धावा झाल्या.
टी-20 विश्वचषकात दुसऱ्यांदाच हे घडले…
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एका षटकात 36 धावा झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग 6 षटकार लगावत 36 धावा काढल्या होत्या. त्यावेळी षटकात बाय किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अतिरिक्त धावा आल्या नव्हत्या. एका षटकात 36 धावा झाल्याची ही केवळ पाचवी वेळ आहे.
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा
(A) युवराज सिंग (भारत) : 36 धावा (6,6,6,6,6,6) विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), डर्बन 2007
(B) किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) : 36 धावा (6,6,6,6,6,6) विरुद्ध अकिला धनंजय (श्रीलंका), कूलिज 2021
(C) रोहित शर्मा आणि रिंकू सिंग (भारत) : 36 धावा (4,nb+6,6,1) आणि (6,6,6) विरुद्ध करीम जनात (अफगाणिस्तान), बेंगळुरू 2024
(D) दीपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ) : 36 धावा (6,6,6,6,6,6) विरुद्ध कामरान खान (कतार), अल अमेरत, 2024
(E) निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) : 36 धावा (6,nb+4,wb+4,lb4,4,6,6)विरुद्ध अजमतुल्लाह उमरजई (अफगाणिस्तान), सेंट लुसिया 2024






