T20 Mumbai League : सूर्याचा बॅड पॅच संपेना! कर्णधारपद गेल्यानंतरही ओढवली नामुष्की; टी-२० मुबई लीगमध्येही श्रेयसच ठरतोय सरस
T20 Mumbai League : स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीयेत.

Suryakumar Yadav vs Shreyas Iyer T20 Mumbai League 2026 : भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीयेत. आंतरराष्ट्रीय स्तरापाठोपाठ आता घरच्या ‘टी-२० मुंबई लीग २०२६’ मध्येही सूर्याची बॅट आणि कप्तानी दोन्ही सपशेल फ्लॉप ठरत आहेत. ४ जून रोजी झालेल्या सामन्यात सूर्यकुमारच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे, टीम इंडियाचा भावी टी-२० कर्णधार मानल्या जाणाऱ्या श्रेयस अय्यरच्या संघाने मात्र लीगमध्ये आपल्या पहिल्या विजयाचा गुलाल उधळला आहे.
श्रेयस अय्यरच्या संघाचा थरारक विजय; अय्यरचे मोलाचे योगदान!
टी-२० मुंबई लीगमध्ये १ जूनपासून या दोन्ही स्टार खेळाडूंच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. ४ जून रोजी मोसमातील ७ व्या सामन्यात श्रेयस अय्यरचा समावेश असलेल्या ‘SoBo मुंबई फाल्कन्स’ संघाचा सामना ‘MSC मराठा रॉयल्स’विरुद्ध झाला. या सामन्यात मराठा रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आदित्य तारेच्या कप्तानीखालील ‘SoBo मुंबई फाल्कन्स’ने ७ गडी गमावून १९.१ षटकांत हे आव्हान पार केले आणि ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयात श्रेयस अय्यरने १२५ च्या स्ट्राईक रेटने २ चौकार आणि २ षटकारांसह मोलाच्या ३० धावा केल्या. पहिल्या सामन्यात अवघ्या ५ धावांवर बाद झालेल्या अय्यरने दुसऱ्या सामन्यात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले.
सूर्याची अवस्था दयनीय; कप्तानी अन् फलंदाजीतही अपयश!
After a difficult IPL season, SKY’s struggles have continued in the T20 Mumbai League. 💔
Mumbai’s star batter will be hoping to find his touch again soon. 👀🏏#SuryakumarYadav #T20MumbaiLeague #Sportskeeda pic.twitter.com/PHtNsTW4Tq
— Sportskeeda (@Sportskeeda) June 5, 2026
दुसरीकडे, मोसमातील ८ व्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या कप्तानीखालील ‘ट्रिंफ नाईट MSC’ संघाला ‘बांद्रा ब्लास्टर्स’कडून ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. ट्रिंफ नाईटने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७८ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली होती. मात्र, बांद्रा ब्लास्टर्सने अवघ्या ३ चेंडू राखून १९.३ षटकांत १७९ धावा करत सामना जिंकला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ ६ चेंडूंत ४ धावा करून बाद झाला. ट्रिंफ नाईटचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी २ जून रोजी ‘नॉर्थ मुंबई पँथर्स’विरुद्धच्या सामन्यातही त्यांना २१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता आणि तिथेही सूर्याने केवळ १९ धावा केल्या होत्या.
लीगमध्ये श्रेयस ठरतोय सरस!
आतापर्यंत खेळलेल्या २-२ सामन्यांनंतर दोघांच्या कामगिरीची तुलना केल्यास श्रेयस अय्यर हा सूर्यापेक्षा सरस ठरताना दिसतोय. सूर्यकुमारने २ सामन्यांत मिळून फक्त २३ धावा केल्या आहेत, तर श्रेयस अय्यरने एका डावात ३० धावा करत २ सामन्यांत एकूण ३५ धावा फटकावल्या आहेत. मैदानावर फॉर्म परत मिळवण्यासाठी सूर्या सध्या प्रचंड झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे.





