मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना भारतीय संघाला नवोदित फिरकी गोलंदाज मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला झालेल्या दुखापतीने फटका बसला आहे. आता त्याच्या जागी लेग स्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहल याची संघात निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. वरुण चक्रवर्तीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्वकरंडक स्पर्धेत खेळता येणार नसल्याचेही सांगितले जात असून बीसीसीआयनेच चहलच्या निवडीची शक्यता वर्तवली आहे. आयपीएलमध्ये सातत्याने सरस कामगिरी केल्यामुळे आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी वरुण हा भारताचा प्रमुख गोलंदाज ठरत होता. तमिळनाडूचा हा मिस्ट्री गोलंदाज सध्या दुखापतीमुळे त्रस्त असला तरीही तो आयपीएल स्पर्धेतील उर्वरित लढती खेळणार असल्याचेही सांगितले जात आहे. बीसीसीआय येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकत असल्याने वरुणच्या जागी चहलची निवड करणे शक्य होणार आहे. आयपीएल स्पर्धेत वरुणच्या गुडघ्यांना दुखापत झाली असून त्याच्यावर सातत्याने उपचारही केले जात आहेत. वरुणने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 13 सामन्यांतून 15 बळी घेतले आहेत. भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर) भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, राहुल चहर, महंमद शमी, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन व वरुण चक्रवर्ती (निर्णय तंदुरुस्तीवर अवलंबून). राखीव – श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर.