Swiss Air Fire : २४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात आग; विमानतळावर हाय अलर्ट
Swiss Air Fire : दिल्लीहून झुरिचला जाणाऱ्या स्विस एअर (LX147) विमानाच्या इंजिनला आग लागली. आपत्कालीन स्लाईड्सवरून उतरताना ६ प्रवासी जखमी झाले

Swiss Air Fire : रविवारी पहाटे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, नवी दिल्लीहून झुरिचला जाणाऱ्या ‘स्विस इंटरनॅशनल एअरलाईन्स’च्या विमानाला आग लागली. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान सहा प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. (Swiss Air Fire)
जखमींवर सध्या गुरुग्राम येथील ‘मेदांता रुग्णालयात’ उपचार सुरू आहेत. विमान क्रमांक एलएक्स147 हे रविवारी पहाटे १:०८ वाजता टर्मिनल ३ च्या धावपट्टी १०/२८ वरून उड्डाण करण्याच्या तयारीत होते. (Swiss Air Fire)
या विमानात चार अर्भके आणि १३ कर्मचाऱ्यांसह एकूण २४५ प्रवासी होते. एअरबस ए330 हे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असताना, वैमानिकाला विमानाच्या मागील बाजूस असलेल्या डाव्या चाकातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Swiss Air Fire)
नियमवलीनुसार रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या विशेष वाहनांनी आग विझवली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विमानाच्या पुढील आणि मागील दरवाजांमधून आपत्कालीन स्लाईड्स खाली सोडण्यात आल्या.
बचावकार्यादरम्यान सहा प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. ज्या प्रवाशांना स्लाईड्सचा वापर करणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी शिड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. स्विस एअरलाईन्सने एका निवेदनाद्वारे या घटनेला दुजोरा दिला असून, विमानातील कर्मचारी सुखरूप असल्याचे स्पष्ट केले आहे. (Swiss Air Fire)
विमानाची पाहणी करण्यासाठी आणि पुढील आवश्यक पावले उचलण्यासाठी स्विसचे तांत्रिक तज्ज्ञ दिल्लीला भेट देतील. त्याच वेळी, सर्व प्रवाशांसाठी पुढील प्रवासाची जलद आणि योग्य पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ते युद्धपातळीवर काम करत आहेत.
त्यासाठी एक कार्यदल स्थापन केले असून, विमानाची पाहणी करण्यासाठी आणि या घटनेचे कारण शोधून काढण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. प्रवाशांना घटनास्थळीच पुनर्बुकिंग, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि पुढील संपर्कासाठी संपर्क कार्ड्स देऊन मदत केली जात आहे. (Swiss Air Fire)


