Summer Hair Care: उन्हाळ्याच्या दिवसांत उकाडा, घाम आणि वाढतं प्रदूषण यामुळे केसांची स्थिती बिघडते. केस लवकर तेलकट होतात, चिकट वाटतात आणि अनेकदा केस गळणे, कोंडा किंवा कोरडेपणा अशा समस्या वाढतात. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो उन्हाळ्यात केस नेमके किती वेळा धुवावेत? तज्ञांच्या मते, केस धुण्याची योग्य वेळ प्रत्येकाच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते. दररोज केस धुणे काही वेळा नुकसानकारक ठरू शकते, कारण त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊन केस कोरडे आणि निस्तेज दिसू शकतात. आपल्या टाळूवर ‘सीबम’ नावाचं नैसर्गिक तेल तयार होतं. हे तेल केसांना ओलावा देतं आणि त्यांना बाहेरील धूळ व नुकसानापासून वाचवतं. पण उन्हाळ्यात जास्त घाम येतो, तेव्हा हे तेल धूळ आणि घाणीसोबत मिसळून टाळूवर साचतं. त्यामुळे केस चिकट होतात, खाज येते आणि कोंड्याची समस्या वाढू शकते. केसांच्या प्रकारानुसार किती वेळा धुवावेत? जर तुमचे केस खूप लवकर तेलकट होत असतील, तर आठवड्यात किमान ३ वेळा केस धुणे योग्य ठरते. कोरडे किंवा कुरळे केस असतील, तर अशा केसांमध्ये नैसर्गिक तेल खालीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आठवड्यात १ ते २ वेळा केस धुणे पुरेसे असते. पातळ आणि सरळ केस असतील, तर ते लवकर तेलकट दिसतात. अशा वेळी एक दिवस आड केस धुणे योग्य ठरते. All about hair wash केस धुण्याची योग्य पद्धत काय? फक्त केस धुणे पुरेसे नसते, तर योग्य पद्धतीने धुणेही महत्त्वाचे आहे. शॅम्पू थेट केसांवर ओतू नका. आधी हातावर थोडा शॅम्पू घेऊन त्यात पाणी मिसळा आणि मग तो टाळूवर हलक्या हाताने लावा. केस धुताना खूप गरम पाणी वापरू नका, कारण त्यामुळे केसांतील ओलावा कमी होतो. कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करणं अधिक चांगलं ठरतं. कंडिशनर का महत्त्वाचा आहे? उन्हाळ्यात कडक उन्हामुळे केसांची वरची लेयर खराब होते. त्यामुळे शॅम्पूनंतर कंडिशनर वापरणं आवश्यक आहे. कंडिशनरमुळे केस मऊ राहतात, गुंतत नाहीत आणि तुटण्याची शक्यता कमी होते. मात्र कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर लावा, टाळूवर नाही. एकंदरीत, उन्हाळ्यात केसांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांना वारंवार धुण्यापेक्षा योग्य वेळ आणि योग्य पद्धत अधिक महत्त्वाची आहे. आपल्या केसांच्या प्रकारानुसार दिनचर्या ठरवली, तर केस निरोगी, मजबूत आणि चमकदार राहू शकतात.