Swargate rape case | दत्तात्रेय गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुण्यासह राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याचा दुसरा जामीन अर्जही अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी फेटाळला. आरोपीने महिलेविरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने हा निकाल दिला. तसेच, त्याच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही पुणे पोलिसांना दिले.
स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाडेविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी केलेला पहिला अर्ज सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फेटाळला.
त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाडेने पुन्हा आपल्या वकिलांमार्फत दुसरा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. हा बलात्कार नसून, परस्पर सहमतीने संबंध आहेत. आरोपीची पत्नी व दोन मुले त्याच्यावर अवलंबून आहेत. या प्रकरणी तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले असल्याने परिस्थितीत बदल झाला आहे.
या आधारावर आरोपीला जामीन द्यावा, असा बचाव ॲड. वाजेद खान बीडकर यांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी विरोध दर्शविला. आरोपीचा पहिला जामीन अर्ज आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच फेटाळण्यात आला असल्याने परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी केली होती.





