स्वारगेट प्रकरण: आरोपीच्या कोठडीचा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे –स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अतिरिक्त पोलिस कोठडी मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपासाला अडथळा निर्माण झाला आहे.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. यापूर्वी न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी तपास जवळपास पूर्ण केला असून, लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तरीही, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक चौकशीसाठी पोलिसांनी २ एप्रिल रोजी तीन दिवसांच्या अतिरिक्त कोठडीसाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने पोलिसांना यापूर्वीच पुरेशी कोठडी मिळाल्याचे सांगत हा अर्ज नामंजूर केला. या खटल्यात बचाव पक्षाची बाजू वाजेद खान (बिडकर) यांनी मांडली. या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपासात नवे वळण येण्याची शक्यता आहे.





