नगर | दिव्यांगांची आज ‘स्वर दीपावली’ संगीत मैफल

नगर – दिव्यदृष्टी संस्थेच्या वतीने अंध-दिव्यांग असणाऱ्या कलाकारांची रविवारी (दि.२७) या संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते या मैफलीचे उदघाटन होणार आहे, अशी माहिती नीलेश शिंदे यांनी दिली.
शहरातील सावेडी येथील माउली सभागृहात ‘स्वर दीपावली’ या अनोख्या संगीत मैफिलीचे सायंकाळी ६ ते ९ यावेळेत आयोजन केले आहे. हॉटेल उद्योग व्यावसायिक धनेश बोगावत, शिल्पकार प्रमोद कांबळे, सिनेअभिनेते महेश काळे, उद्योजक एन. बी. धुमाळ, ब्रिगेडियर राजू चावला हे प्रमुख उपस्थित राहणार आहे. गांधर्व विश्व विद्यालय व सुगम संगीत विद्यालयद्वारा संगीत विशारद नीलेश शिंदे, सुहास नरवडे, अलका शिंदे, वर्षा पड्याळ यांचे गायन होणार आहे.
अंकुश जाधव, मनोज धावारे, स्वप्नील पड्याळ, सौदागर लोंढे, सलीम अत्तार, महेश नेऊल आदी कलाकार वाद्यासह साथसंगत करणार आहेत. आकाशवाणीचे निवेदक नितीन जावळे या मैफिलीचे सूत्रसंचालन करणार आहेत. हे सर्व कलाकार अंध – दिव्यांग असल्याने रसिक नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दिव्यदृष्टीचे कृष्णा तवले, धवण उम्रेडकर, सुभाष शिंदे, सुनील बाचकर, किरण खेतमाळस आदींनी केले आहे.
दिव्यदृष्टीचे सर्व पदाधिकारी हे दिव्यांग आहेत. शासनाच्या विविध विभागात महत्त्वाच्या पदावर काम करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून इतर दिव्यांगांच्या विकासासाठी कार्यरत आहे. दिव्यांगांना दिवाळीसाठी किराणा किट दिली जाणार आहे. संस्थेस दिलेल्या सर्व आर्थिक देणग्यांना आयकर कलम ८० जी नुसार आयकरात सवलत आहे. समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करावी.
– कृष्णा तवले, अध्यक्ष, दिव्यदृष्टी संस्था, नालेगाव, अहिल्यानगर





