स्वरा भास्करचे पती फहद अहमद विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक; मुंबईतील ‘या’ मतदारसंघासाठी केली मविआकडे मागणी

Fahad Ahmed | विधानसभा निवडणूकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष देखील काही मतदार संघासाठी मागणी करत आहेत. मुंबईतील अनुशक्ती नगर येथील विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे.
मुंबईतील अणुशक्तीनगर येथे विद्यमान आमदार नवाब मलिक आहेत, जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत अजित पवारांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र याच ठिकाणी समाजवादी पक्ष जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे.
अबू आझमी यांच्या पक्षातर्फे फहद अहमद हे इच्छुक उमेदवार असून त्यांच्यासाठी समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये अनुशक्ती नगरची जागा मागितली आहे.
कोण आहे फहद अहमद?
फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती असून ते समाजवादी पक्षाचे नेते आहेत. सध्या ते समाजवादीच्या युवा आघाडीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतात. फहद अहमद यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत होते.
स्वरा भास्करसोबत लग्न
फहद अहमद यांनी 16 फेब्रुवारी 2023 ला बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसोबत लग्न केलं होतं. यानंतर त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. मात्र स्वरा भास्करने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. 23 सप्टेंबर 2023 ला स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला. Fahad Ahmed |
2019 आणि 2014 च्या निवडणुकीची स्थिती
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक 65,217 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे 39,966 मते मिळवून विजयी झाले होते. तेव्हा नवाब मलिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. Fahad Ahmed |
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना केली होती अटक
महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री होते. मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांना अटक करण्यात आली होती. सध्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जेलमधून जामीन मिळाला. परंतु यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळणार का? हा सवाल केला जात आहे.
तर दुसरीकडे, मनी लॉन्ड्रिंग आरोप आणि भाजपचा विरोध यामुळे या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिकांच्या मुलीला उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





