Swara Bhasker: पतीवर झालेल्या जातीवादी टिप्पणीवर संतापली स्वरा भास्कर; ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर

Swara Bhasker: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते, मात्र यावेळी निशाणा तिच्यावर नव्हे तर तिच्या पतीवर होता. नुकतेच एका सोशल मीडिया युजरने स्वरा भास्करच्या पती फहाद अहमद यांच्यावर अपमानास्पद आणि जातीवादी टिप्पणी केली, ज्यामुळे अभिनेत्रीने संताप व्यक्त करत त्या ट्रोलरला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
पतीवर झालेल्या टिप्पणीमुळे संतापली स्वरा
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद सध्या ‘पति पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी आहेत. या शोमधील काही व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका युजरने परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्याशी तुलना करत, स्वरा-फहाद जोडप्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले. युजरने फहाद यांना “डोंगरीचा छपरी” आणि “रेहडी-पटरीवाला” असं म्हटलं.
“तू जातीवादी आणि कचऱ्याचं डोकं असलेला आहेस”
स्वराने यावर संताप व्यक्त करत ट्विट केलं, “हा मूर्ख स्वतःला अभिमानी हिंदू आणि आंबेडकरवादी म्हणवतो, पण ‘छपरी’ हा जातिवादी शब्द आहे हे त्याला माहीत नाही. हा शब्द छप्पर किंवा झोपड्या बनवणाऱ्या समुदायासाठी वापरला जातो आणि त्यांचा अपमान करतो. आणि हो, डोंगरीचा असणं किंवा स्ट्रीट वेंडर असणं यात काहीही चुकीचं नाही. पण तू मात्र जातीवादी आणि घाणेरडं डोकं असलेला व्यक्ती आहेस.”
चाहत्यांनी केलं स्वरा भास्करचं कौतुक
स्वराच्या या प्रत्युत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी तिच्या परखड मताची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर लोकांनी तिच्या स्पष्ट बोलण्याचं स्वागत केलं असून ट्रोलर्सला योग्य उत्तर दिल्याबद्दल पाठिंबा दर्शवला आहे.
स्वरा-फहाद यांची प्रेमकहाणी
स्वरा आणि फहाद यांची भेट 2020 साली मुंबईतील एका आंदोलनादरम्यान झाली होती. ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. त्यांनी 6 जानेवारी 2023 रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 अंतर्गत लग्न केलं. त्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
एका मुलाखतीत स्वराने कबूल केलं होतं की फहादशी लग्न करताना ती खूप घाबरली होती. तिला भीती होती की बॉलिवूडमधील पार्टींमध्ये तिला यापुढे बोलावलं जाणार नाही. पण तिने समाजाच्या टिकेला आणि स्वतःच्या भीतीला न जुमानता आपलं नातं मजबूत केलं.





