‘स्वदेशी’ सर्वेक्षण वाहनामुळे लष्कराला बळ

पुणे- स्वदेशी बनावटीच्या “शस्त्रसज्ज सर्वेक्षण’ वाहन अर्थात आर्म्ड इंजिनिअर रिकन्साइन्स व्हेईकल (एईआरव्ही) हे मंगळवारी लष्करी सेवेत दाखल झाले. लष्करप्रमुख जनरल मुकंद नरवणे यांच्या उपस्थितीत बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) येथील गुरनाम तलाव परिसरात हा सोहळा झाला.
सीमाभागात लष्कराच्या आवश्यकतेनुसार, जमीन अथवा एखादा भाग, पाणथळांचे
सर्वेक्षण, जमिनीचा पोत, पाण्याची खोली तपासणे यासारख्या विविध कामांसाठी हे वाहन तयार करण्यात आले आहे. हे वाहन जमीन आणि पाण्यातही प्रवास करू शकणारे उभयचर प्रकारातील वाहन आहे. या वाहनाची रचना ही रशियन “बीएमपी’ वाहनावर आधारित आहे. मात्र, याची निर्मिती ही पूर्णपणे स्वदेशी सामग्रींद्वारे वीाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची पुण्यातील “एआरडीई’ प्रयोगशाळेत वाहनाची रचना, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने साहित्ये जोडली आहे. तर ऑर्डनन्स फॅक्टरी मेढक (तेलंगणा) येथे या वाहनाची प्रत्यक्ष निर्मिती करण्यात आली आहे. लष्कराच्या ताफ्यात अशी 53 वाहने सहभागी केली जाणार आहेत.
“नव्या पिढीतील हे
सर्वेक्षण वाहन लष्कराला समर्पित करताना मनापासून आनंद होत आहे. बदलत्या काळात नवीन उपकरणांद्वारे सैन्याला आणखी बळ मिळते. स्वदेशी निर्मितीमुळे सैन्याला अधिक प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर सीमाभागात आतापर्यंत जवान प्रत्यक्षपणे
सर्वेक्षण करत होते. अशावेळी धोका असतो. या वाहनामुळे हे काम अधिक सुरक्षित आणि जलदपणे शक्य होणार आहे.
– जनरल मुकंद नरवणे, लष्करप्रमुख





