पिंपरी | ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची तळेगावात सुरूवात

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे एसटी आगारातून स्वच्छतेची शपथ घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर विभाग प्रमुख कल्याणी लाडे यांसह सीआरपीएफचे ४०० जवान, नगरपरिषदेचे १५० हून कर्मचारी, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता पंधरावडा’ साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, सीआरपीएफ तळेगाव दाभाडे आणि तळेगाव दाभाडे रोटरी क्लब यांच्या सहयोगाने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमादरम्यान बोलताना रुपाली चाकणकर यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तर ममता राठोड यांनी स्वच्छतेसंबंधी जागरूकता वाढविणारी कविता सादर केली. यावेळी तळेगाव दाभाडे एसटी आगार, सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यान आदी ठिकाणे स्वच्छ केली गेली.





