स्वच्छोत्सव 2023: लडाखच्या शिष्टमंडळाला पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची भुरळ

पुणे – केंद्रशासन व राज्यशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छोत्सव 2023 उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत स्वच्छता यात्रा या उपक्रमाअंतर्गत लडाख संघ राज्यातील बचतगटांच्या 12 महिला सदस्यांनी नुकतीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची माहिती घेतली.
यावेळी कचरा व्यवस्थापनात महिलांचा असलेला सहभाग तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाने केली. तसेच, या सर्व कामाचे त्यांनी विशेष कौतुक केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली.
नुकतेच गोवा राज्यातील शिष्टमंडळ येऊन गेले असताना, लडाख मधील शिष्टमंडळाने स्वत: पुण्याला भेट देण्याची निवड केली असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान, या शिष्टमंडळाने स्वच्छ संस्थेकडून घरोघरी केले जाणारे कचरा संकलन, शहरातील कचरा संकलन व्यवस्थापन, महापालिकेचा लाईट हाऊस प्रकल्प अशा वेगवेगळया प्रकल्पांची पाहणी केली.





