धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देण्याचे पीडिपीचे सूतोवाच; इल्तिजा मुफ्ती यांनी मांडली पक्षाची भूमिका

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांना काही तासांचाच कालावधी शिल्लक असताना, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा (पीडीपी) समावेश असलेल्या राज्य सरकारच्या स्थापनेसाठी अनेक पर्यायांवर चर्चा झडताना दिसत आहेत. तथापि, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने स्पष्ट केले आहे की ते निकाल लागल्यानंतरच धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देण्याबाबत काही भाष्य करतील.
विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पुढील सरकार धर्मनिरपेक्ष असेल आणि त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. सोमवारी, पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या माध्यम सल्लागार आणि त्यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ट्विट केले की निकाल आल्यानंतरच पीडीपीचे वरिष्ठ नेतृत्व धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेईल. ही आमची अधिकृत भूमिका आहे.
बहुतांश एक्झिट पोलने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-एनसी आघाडीला फायदा होईल, असा अंदाज वर्तवला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मात्र निकाल त्यांच्या पक्षाच्या बाजूने असूनही एक्झिट पोलचे वर्णन फक्त टाईमपास असे केले.
अनेक एक्झिट पोलने नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस युतीच्या बाजूने कौल दिला असून भाकीत केले की नॅशनल कॉन्फरन्स हा जम्मू काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. प्रामुख्याने काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला 45-50 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपला 23-27 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीडीपी 5 ते 12 जागांवर विजयी होताना दिसत आहे.





