रणथंबोरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यु

रणथंबोर : सवाई माधोपूर येथील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये रविवारी टी५८ वाघाच्या आकस्मिक मृत्यूने वन अधिकाऱ्यांना धक्का बसला. वनविभागाने वाघ टी 58 चा मृतदेह ताब्यात घेऊन राजबाग नाका चौकीत नेला, जिथे आज वाघाच्या मृतदेहाचे वैद्यकीय मंडळाच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.
तरिही विषप्रयोग आणि इतर कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. वाघाच्या मृतदेहाचे नमुने व्हिसेरा घेण्यात आले असून ते तपासासाठी बरेली आणि भरतपूरला पाठवण्यात आले आहेत. वास्तविक रविवारी हिंदवड गावाजवळ टायगर टी 58 ची हालचाल दिसून आली होती. याच काळात वाघाने तिथे एका म्हशीचीही शिकार केल्याचे सांगितले जात आहे.
हिंदवड गावाजवळील शेतात टी 58 वाघ बसला होता, त्यामुळे घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि वाघावरही नजर ठेवण्यात येत होती, मात्र रविवारी सायंकाळी वाघाचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे हा संशयास्पद मृत्यु असू शकतो, असे वनअधिकारी सांगत आहेत.





