मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवेने घरगुती वादातून मुंबईच्या वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. ती शनिवारी संध्याकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे गौरीच्या वडिलांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारी मध्येच या जोडप्याने लग्न केले होते. पालवे ही केईएम रुग्णालयात दंत विभागात डॉक्टर होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पालवे यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले आणि त्रास दिला.त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यावरती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये मुंडे यांनी म्हटले, काल (22 नोव्हेंबर) संध्याकाळी 6.45 वाजता माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खुप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर करू नये, त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करणारी असल्याचे त्या म्हणाल्या.