सोलापूर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रमाणेच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात देखील एक धक्कादायक आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. चिंचोळी एमआयडीसी येथे ३ महिन्याच्या गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. आशाराणी पवन भोसले (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. आशाराणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तीन महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता. यापूर्वीही चार ते पाच वेळा घरगुती वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तक्रार निवारण केंद्राचे समुपदेशन निष्प्रभ दरम्यान, 2024 मध्ये तिला मारहाण करून माहेरी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राने पती-पत्नीचं समुपदेशन केलं होतं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतरही त्रास सुरुच राहिला आणि अखेर आशाराणीने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली असून सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहे. जो पर्यंत आरोपींना अटक होतं नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे. ही घटना पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर घडल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवरील अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.