तंबाखू विकणाऱ्याकडून पैसे मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे – करोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर, अशा कठोर काळात रस्त्यावर सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना काही लाचखोर पोलिसांमुळे “खाकी’ला आणखी एक डाग लागला आहे. लॉकडाऊन काळात किराणा दुकानात अशाचप्रकारे तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदाराला कारवाईची भीती दाखवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपये मागितले.
दुकानदाराने 2 हजार 300 रुपये दिले. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्याने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा आदेश पोलीस उपआयुक्त सुहास बावचे यांनी दिला आहे. हर्षद नामदेव मांढरे आणि सागर सूर्यवंशी असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
कात्रजमध्ये खडी मशीन चौकातील एका किराणा मालाचे दुकानात तंबाखू व गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती मांढरे व सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी कारवाईचा धाक दाखवत परस्पर दुकानदाराला पैसे मागितले. त्यानंतर एका अनोळखी महिलेस दुकानात पाठवून 2 हजार 300 रुपये घेतले. त्यानंतर याबाबत दुकानदाराने कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितला.





