राष्ट्रवादीच्या आठ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखी बंडखोरांनी दिली. महायुतीमध्ये तीन तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही, त्यातील काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली. त्यातील काहींना शांत करण्याचे प्रयत्न महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले.
मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली आणि आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही बंडखोर मागे हटायला तयार नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या आठ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार,नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पुजा व्यवहारे यांच्यासह आठ जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी निलंबनाची कारवाई करताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.





