Sushma Andhare: ३,५४१ कोटी अतिरिक्त खर्च केला कुठून? लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांचा सरकारला थेट सवाल
Sushma Andhare: महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी अतिरिक्त खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा; अंधारेंचे थेट आव्हान.

Sushma Andhare – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी २९ हजार ६९३ कोटी निधी मंजूर असताना ३३ हजार २५७ कोटी खर्च करून सरकारने ३ हजार ५४१ कोटी अतिरिक्त खर्च कुठून केला? हा निधी बार्टी किंवा महाज्योतीमधून वळवला का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांना उत्तर देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत कॅगने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला धारेवर धरले. अंधारे म्हणाल्या, की विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा दोन कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी होत्या. पंधराशे रुपये देऊन पगारी मतदार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुका संपताच मतदारांची गरज उरली नाही. त्यामुळे विविध निकषांच्या नावाखाली ९२ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले.
ज्या महिलांना वगळले आहे, त्यांच्यावर आतापर्यंत १ लाख ६५ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, योजना राबवताना येणार्या अडचणींचा कुठलाही अभ्यास केला नसल्याने याचा भुर्दंड राज्यातील जनतेला सोसावा लागत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांना जाऊन सहा महिने झाले असून, सध्या अर्थ खात्याला वाली नाही.
खात्यावर नियंत्रण नसल्याने पैशांचा हिशोब कोणाकडे मागायचा. महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांच्या खात्यातून जास्त पैसे खर्च झाले असल्याने, त्यांनीच या ३ हजार ५४१ कोटींच्या अतिरिक्त खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा. राज्यात पाऊस, बोगस बियाणे आणि दुर्घटनांचे गंभीर प्रश्न असताना सत्ताधाऱ्यांना आमिर खानच्या लग्नात रस आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.




