शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई – सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांना शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश करताच अंधारे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची शिवसेना उपनेतेपदी निवड केली आहे. सुषमा अंधारे या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित अशा सामाजिक कार्यकर्त्या असल्याची त्यांची ओळख आहे.
यावेळी अंधारे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही युद्ध सुरु असताना आलात, तुमचे खूप महत्व आहे. दरम्यान, सुषमा अंधारे या 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत नवीन गट स्थापन केला. अनेक आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या बळावर त्यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री पद मिळवले. अनेक आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अशावेळी त्यांनी आता पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र जमा करण्यास आणि शिवसेनेत नवीन नेत्यांची भरती करण्याचा धडाका सुरू केल्याचे दिसत आहे.





