‘कोणतीही क्लीन चिट देण्यात आलेली नाही’, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर ‘या’ वकिलाने केला मोठा दावा

Sushant Singh Rajput Death Case | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षांनी हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. तसेच, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांनी यावर बोलताना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट देण्यात आली नसून, लोकं चुकीची माहिती पसरवत असल्याचे म्हटले आहे.
निलेश सी ओझा हे दिशा सालियानच्या वडिलांचे वकील आहेत. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर बोलताना ते म्हणाले की, कायद्यासमोर या रिपोर्टचे कोणतेच महत्त्व नाही. न्यायालय अजूनही या प्रकरणाची दखल घेऊ शकते व पुढील तपासाचे आदेश देऊ शकते.
या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, लोक खोट्या गोष्टी पसरवत आहेत. या अहवालाला काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. दिशाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह अनेक जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
वकील निलेश ओझा म्हणाले की, क्लोजर रिपोर्टनंतरही न्यायालय आरुषी तलवार प्रकरणाप्रामणे याची दखल घेऊ शकते. अटक वॉरंट जारी करू शकते किंवा पुढील तपासाचे आदेश देऊ शकते.
दरम्यान, दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. या दोन्ही मृत्यूंमुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.





