पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवानचा ‘हा’ मोठा विक्रम मोडण्याची सूर्यकुमार यादवला संधी…

भारताचा सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्या फलंदाजीच्या शैलीने सर्वांनाच भुरळ घालत आहे. कोणत्याही सामन्यात तो मैदानात उतरला की चाहत्यांचा जल्लोष सुरु होतो. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीची जणू तो भिंतच बनला आहे. सूर्यकुमार यादवने काल साऊथ आफ्रिका विरुध्द्व खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी ५७३ चेंडूत १००० धावा पूर्ण करणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमारला आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
साऊथ आफ्रिका विरुध्द्व काल सूर्यकुमार यादवने २२ चेंडूंत ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. विराटसोबत दमदार फलंदाजी करत असताना तो धावबाद झाला. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १००० धावाही पूर्ण केल्या. २०२२ या वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे.
त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ७९३ धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. २०२१ या वर्षात रिझवानने १३२६ धावा केलेल्या आहेत. याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर २०२१ या वर्षात ९३९ धावासह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ७९३ धावांसह सूर्यकुमार यादव आहे. त्यामुळे या दोघांच्या पुढे जाण्याची सूर्यकुमारला पुरेपूर संधी आहे. ( Suryakumar Yadav’s chance to break the big record of Babar and Rizwan of Pakistan )
सूर्यकुमारला बाबर आझमच्या पुढे जाण्यासाठी १४७ धावा आणि मोहम्मद रिझवानच्या पुढे जाण्यासाठी ५३४ धावांची गरज आहे. मात्र सूर्यकुमारची सध्याची फलंदाजी पाहता त्याच्यासाठी हे काम जास्त अवघड नाही असेच वाटत आहे.
१३२६ धावा – मोहम्मद. रिझवान (२०२१) पाकिस्तान
९३९ धावा – बाबर आझम (२०२१) पाकिस्तान
७९३ धावा – सूर्यकुमार यादव (२०२२) भारत
७४८ धावा – पॉल स्टारलिंग (२०१९) आयर्लंड





