Suryakumar Yadav : दोन दिवस आधी नव्हे, ‘या’ वेळेपासून वर्ल्ड कपची तयारी सुरू! सूर्याने सांगितला टीम इंडियाच्या यशाचा फॉर्म्युला

Suryakumar Yadav PC ahead T20 series against SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला मंगळवारपासून कटकच्या मैदानावर सुरुवात होत आहे. या मालिकेसह भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीला औपचारिक सुरुवात करणार आहे. मात्र, भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विश्वचषकाच्या तयारीबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि दमदार विधान केले आहे. त्याने तयारीची तुलना थेट शाळेच्या अभ्यासाशी केली आहे.
विश्वचषकाची तयारी ‘शाळेच्या परीक्षेद्वारे’ समजावली!
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, “टी-२० विश्वचषक २०२६ ची तयारी खरं तर २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक संपल्यापासूनच सुरू झाली आहे. कोणत्याही मोठ्या स्पर्धेसाठी तयारी एक-दोन महिने आधी सुरू होत नाही.”
🗣️ CAPTAIN SURYAKUMAR YADAV ON TEAM INDIA’S VISION
– “We started preparing for the 2026 T20 World Cup right after the 2024 edition.” 🔥🇮🇳#SuryakumarYadav #TeamIndia #T20WorldCup #CaptainSpeakpic.twitter.com/9AATwrIyNl
— Akaran.A (@Akaran_1) December 8, 2025
या तयारीचे महत्त्व पटवून देताना त्याने एक उदाहरण दिले. “जेव्हा आपण शाळेत परीक्षा देतो, तेव्हा फक्त चार दिवस आधी अभ्यास करत नाही, तर वर्षभर अभ्यास करतो. त्याचप्रमाणे, आमची तयारीही खूप आधी सुरू झाली आहे. तेव्हापासून तुम्ही पाहू शकता की आम्ही अनेक नवीन गोष्टींचा प्रयोग करत आहोत आणि त्या सर्व गोष्टी आमच्यासाठी प्रभावी ठरत आहेत,” असे सूर्याने स्पष्ट केले.
हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीचा कहर जारी…! वयाच्या पस्तीशीतही ‘SMAT’मध्ये ओकतोय आग, आकडेवारीने वेधलं लक्ष
टी-२० मध्ये भारताचा शानदार फॉर्म –
गेल्या वर्षी सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक जिंकल्यापासून भारताने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी-२० विश्वचषकात सलग आठ सामने जिंकून भारताने विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून भारताने आपल्या विजयाचा आकडा २६ सामन्यांपर्यंत नेला आहे, ज्यात आशिया कप २०२५ मध्ये सलग सात सामने जिंकण्याचा विक्रमही समाविष्ट आहे. या दरम्यान, भारतीय संघाला फक्त चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
‘सातत्यपूर्ण निवड’ हेच यशाचे गमक –
कर्णधार सूर्यकुमारने भारताच्या अलीकडील यशावर जोर दिला. हा सातत्यपूर्ण निवडीचा परिणाम असल्याचे त्याने सांगितले. “मला वाटते की आम्ही गेल्या पाच-सहा मालिकांमध्ये सारख्याच खेळाडूंच्या संयोजनासह खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही जास्त बदल केलेले नाहीत. सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला याच मार्गाने पुढे जायचे आहे,” असे सूर्या म्हणाला.
टी-२० विश्वचषक (७ फेब्रुवारी ते ८ मार्च) भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या विश्वचषकापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिकेशिवाय न्यूझीलंडविरुद्धही टी-२० मालिका खेळायची आहे.





