Suryakumar Yadav Dahihandi : “इतिहास घडवायचा असेल तर वेड लागलंच पाहिजे!”; ठाण्यात सूर्याची धमाकेदार एन्ट्री; गोविंदांना दिला थेट ऑलिम्पिकचा मंत्र
Suryakumar Yadav Dahihandi : सूर्यकुमार यादवने दहीहंडी उत्सवाला हजेरी लावून उपस्थितांमध्ये प्रचंड ऊर्जा भरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav Attends Thane Vartak Nagar Dahihandi Pro Govinda Olympic Dream : महाराष्ट्रात आज गोपाळकाल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून ‘ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम…’च्या दणदणाटात ठाणे शहर गोविंदांच्या जल्लोषाने दुमदुमले आहे. टेंभी नाका, तलावपाळी, नौपाडा आणि हिरानंदानी मेडॉस परिसरातील मानाच्या दहीहंड्यांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके मानवी मनोरे रचत आहेत. यातच आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वर्तकनगर येथील विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) हजेरी लावून उपस्थितांमध्ये प्रचंड ऊर्जा भरली.
२५ लाखांचे बक्षीस अन् १० थरांचे आव्हान; ठाण्यात विक्रमांची चुरस!
वर्तकनगर येथील दहीहंडीच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यंदा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, तर १० थर यशस्वीरीत्या रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये व मानाची ट्रॉफी दिली जाणार आहे. सकाळपासूनच ठाण्यात मानाच्या हंड्या फोडण्यासाठी राज्यभरातील नामांकित पथकांमध्ये विक्रमांची चढाओढ पाहायला मिळत आहे.
“कसं काय ठाणे?”; सूर्याच्या एन्ट्रीने मैदानात एकच जल्लोष!
VIDEO | Thane: At ‘Sanskruti Yuva Pratisthan Dahi Handi’ in Vartak Nagar organised by Maharashtra Minister Pratap Sarnaik, Cricketer Suryakumar Yadav says, “The atmosphere is absolutely charged. They have created so much energy, so much passion. But for this, I always feel that… pic.twitter.com/YBlc2EK29P
— Press Trust of India (@PTI_News) September 5, 2026
सूर्यकुमार यादव मंचावर दाखल होताच उपस्थित हजारो गोविंदा पथकांनी आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या खास मुंबईकर शैलीत सूर्या म्हणाला, “कसं काय ठाणे? तुमचा आवाज येत नाहीये… आवाज आणखी जोरात झाला पाहिजे!” यानंतर त्याने या भव्य सोहळ्यात आमंत्रित केल्याबद्दल आयोजक प्रताप सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.
“आपल्या खेळाला ऑलिम्पिकमध्ये न्यायचंय!”; गोविंदांना दिला विजयाचा मंत्र
Suryakumar Yadav Enjoying Dahi handi Tournament in Mumbai 😍 pic.twitter.com/7yGjl8tXZF
— Sam (@cricsam02) September 5, 2026
दहीहंडीला अस्सल देशी खेळ सांगत सूर्यकुमार म्हणाला, “आपला ‘प्रो गोविंदा’ झाला आहे, हा आपला पारंपरिक देशी खेळ आहे. या खेळाला आता आपल्याला थेट ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जायचे असून त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल.” क्रिकेटमधील अनुभवाचा दाखला देत तो पुढे म्हणाला, “आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी सांगतो की, खेळाचे वेड लागले पाहिजे… कारण जर इतिहास घडवायचा असेल, तर ते वेड अंगात भिनलेच पाहिजे.”





