पुणे | आशिषकुमार चौहान यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) सहसंस्थापक आशिषकुमार चौहान यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते चौहान यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सूर्यदत्त’चे सल्लागार प्रसन्न पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक डॉ. मनीषा कुंभार, मयूर शहा, प्रा. विवेक स्वामी, प्रा. शीतल भुसारे , प्रा. रागिणी भट, प्रा. आदर्श कातराळे, प्रा. अस्मिता जोशी आदी उपस्थित होते.
आशिषकुमार चौहान म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वांगीण व जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन देशाच्या विकासात योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, आशिषकुमार चौहान यांनी १९९३-२००० या काळात ‘एनएसई’मध्ये केलेल्या कामामुळे त्यांना आधुनिक आर्थिक प्रवाहांचे जनक मानले जाते. अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
आयआयएम, एजेएनआयएफएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट), एनआयटी आणि आयआयआयटी यांसह अनेक प्रसिद्ध सरकारी शैक्षणिक संस्थांच्या मंडळावर ते आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आमचाच सन्मान होत असल्याची भावना आहे.





