ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी सूरमा पाढी यांची बिनविरोध निवड; रचला नवा इतिहास

Odisha New Speaker| भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सूरमा पाढी यांची गुरुवारी ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नयागड जिल्ह्यातील रानपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पाढी या पदासाठी एकमेव उमेदवार होते. त्यांच्या विरोधात कोणताही दुसरा उमेदवार नसल्याने त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात प्रोटेम स्पीकर आरपी स्वेन यांनी पाढी यांच्या निवडीची घोषणा केली आणि त्यांच्याकडे पदभार सोपवला. यानंतर मुख्यमंत्री मोहन चरण माझी, उपमुख्यमंत्री केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा, विरोधी पक्षनेते नवीन पटनायक आणि सभागृहातील इतर सदस्यांनी विधानसभेच्या नवीन अध्यक्षांचे अभिनंदन केले.
दरम्यान, यावेळी भाजपने ओडिशा विधानसभेत एकहाती बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे. पक्षाने 147 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत. बीजेडीकडे 51 आमदार आहेत, काँग्रेसकडे 14, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे एक आमदार आहे, तर तीन आमदार अपक्ष आहेत.
कोण आहेत सुरमा पाढी?
सुरमा पाढी ह्या 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर नयागड जिल्ह्यातील राणपूर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2004 ते 2009 या कालावधीत ओडिशातील बीजेडी आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांनी सहकार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदही भूषवले आहे. पाढी यांनी 1988 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी राणपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी बीजेडीचे सत्यनारायण प्रधान यांचा १५,५४४ मतांनी पराभव केला.
सुरमा पाढी यांनी रचला इतिहास
बिजू जनता दलाच्या (BJD) प्रमिला मलिक यांच्यानंतर ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या पाढी या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. राज्यात प्रथमच भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. त्या राज्यातील भाजपच्या पहिल्या महिला सभापती आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाढी म्हणाले, “या सन्माननीय सभागृहाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मी एका सामान्य कुटुंबातून आले आहे आणि मला इतके प्रतिष्ठित पद आणि जबाबदारी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. मी भारावून गेले आहे,” असे म्हणत त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
हेही वाचा:





