Suresh Kalmadi : राजकीय अस्तित्व संपल्यानंतर सुरेश कलमाडींना दिलासा; ‘या’ प्रकरणात क्लीन चीट; काय आहे प्रकरण?

पुणे : काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून क्लीनचीट मिळाली आहे. २०१० साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्व संपलं. मात्र, तब्बल १५ वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे.
पंधरा वर्षे जुन्या प्रकरणावर दिल्ली न्यायालयाने काल (सोमवारी) 2010 सालच्या कॉमनवेल्थ घोटाळा (राष्ट्रकुल स्पर्धाच्या) आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतरांविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. सध्याच्या प्रकरणासह अनेक गुन्हे व मनी लॉड्रिंगची प्रकरणे दाखल होती. दोन महत्त्वाच्या करारांचे वाटप आणि अंमलबजावणीत सुरेश कलमाडी व इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला होता.
विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले की, सीबीआयने या प्रकरणाचा तपास थांबवला आहे आणि सीबीआयच्या प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अशा परिस्थितीत सुरेश कलमाडी आणि ललित भानोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात काही अर्थ नाही. चौकशीदरम्यान मनी लाँडरिंगचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, या ईडीच्या अहवालाची न्यायालयाने दखल घेतली.
न्यायालयाने म्हटले की, चौकशीदरम्यान ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम ३ अंतर्गत कोणत्याही गुन्ह्याचा कोणताही पुरावा सादर केला नाही. तसेच ईडीने या प्रकरणात सखोल चौकशी केली आहे, त्यामुळे ईडीने दाखल केलेली फिर्यादी तक्रार बंद करण्याची मागणी मान्य करण्यात येत आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या कामांचे कंत्राट गेम्स वर्कफोर्स सर्व्हिस अँड गेम्स प्लॅनिंग, प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेसना देण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींनी ईकेएस आणि अर्न्स्ट अँड यंग नावाच्या कंपन्यांना दोन कंत्राटे देऊन त्यांना अनुचित फायदा मिळवून दिला. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीला सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये, सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि म्हटले की या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या होत्या. सुरेश कलमाडी हे राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीचे प्रमुख होते. या प्रकरणावरून मोठा राजकीय गोंधळ उडाला होता.
काय आहे प्रकरण?
२०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्स (CWG) चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होती. या कॉमनवेल्थमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षाने केला होता. यावरून सीबीआय आणि इडी या संस्थांनी स्वतंत्र चौकशा सुरू केल्या होत्या. या प्रकरणात कॉमनवेल्थ गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भनोट, आणि इतर अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते.
पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
२०१० साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. तब्बल १५ वर्षांनी ईडीकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी यांचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.





