शिरूर : वडनेर खुर्द (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा नवनाथ निचित यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान सरपंच शिल्पा नवनाथ निचित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. जिल्हाधिकारी पुणे तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शिरूर यांच्या आदेशानुसार आज सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणुकीसाठी मंडळ अधिकारी व्ही. आर. फलके हे निवडणूक अधिकारी म्हणून तर ग्रामसेवक पूनम थोरात यांनी सहकार्य केले. निवडणूक बिनविरोध करण्याच्या एकमताने झालेल्या ठरावानंतर सरपंच पदासाठी एकमेव अर्ज सुरेखा नवनाथ निचित यांनी दाखल केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक पूर्तता केल्यानंतर निवडणूक अधिकारी फलके यांनी निचित यांची सरपंच म्हणून अधिकृत घोषणा केली. या निवडीच्या वेळी माजी उपसरपंच विक्रम निचित, माजी सरपंच शिल्पा निचित, विद्यमान उपसरपंच अनिल रामदास वाजे, उद्योजक नवनाथ निचित, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी सुरेखा नवनाथ निचित यांचा सत्कार करून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या. सुरेखा निचित या वडनेर खुर्द गावातील जुने गाव कारभरी कै. आप्पाजी महादू निचित यांच्या नातसून असून, अनंत आप्पाजी निचित, माजी सरपंच एकनाथ हरी निचित, तसेच सोसायटी संचालक बाळासाहेब निचित यांच्या सुनबाई आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून कार्य करणार असल्याचे आश्वासन सुरेखा निचित यांनी या प्रसंगी व्यक्त केले. “ग्रामविकास, पारदर्शक कारभार आणि महिलांच्या सहभागातून प्रगती” हा माझा उद्देश असेल,” असेही त्या म्हणाल्या.