सुप्रिया सुळेंच व्हाॅट्सअॅप स्टेटस चर्चेत! “सहन करायला शिक” आईचा सल्ला केला अधोरेखित, म्हणाल्या दादाची आठवण येतेय

Supriya Sule : आज १० जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बालेवाडी संकुलात होत आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहे. दोन्ही ठिकाणाच्या कार्यक्रमाला पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठेवलेले व्हाॅट्सअॅप स्टेटसमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. तसेच माध्यमांशी बोलताना दादांची (अजित पवार) आठवण रोजच येते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दिवाळी, भाऊबीज आणि इतर सणांना मी त्यांना शुभेच्छा देत असते. मला सहा भाऊ आहेत, सगळ्यांचीच आठवण येते, असे देखील त्या यावेळी पुढे बोलताना म्हणाल्या.
व्हाॅट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना
कर्तव्य करत राहायचं, संस्कार कधी विसरायचे नाहीत.. “सहन करायला शिक” आईने मला सांगितलं होतं, हे मी रोज स्वतःला सांगते. असे म्हणत सुळेंनी आपल्या भावना व्हाॅट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ‘आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत रहायचे,’ असे देखील त्यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्या आईने मला सल्ला दिला आहे आणि तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला असल्याचा खुलासा त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पक्षाचे दोन महत्त्वाचे शिलेदार, सत्यजितसिंह पाटणकर (सातारा) आणि वैभव पाटील (सांगली) हे भाजपात प्रवेश करणार आहेत. यामुळे शरद पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.
हेही वाचा: “राष्ट्रवादी वर्धापनदिनी भाजपाचा ‘राजकीय डाव’; शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात जोरादार धक्का





