“राष्ट्रवादी वर्धापनदिनी भाजपाचा ‘राजकीय डाव’; शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात जोरादार धक्का

Sharad Pawar News : आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पक्षाचे दोन महत्त्वाचे शिलेदार, सत्यजितसिंह पाटणकर (सातारा) आणि वैभव पाटील (सांगली) हे भाजपात प्रवेश करणार आहेत. यामुळे शरद पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.
साताऱ्यातील राजकीय भूकंप : सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील प्रभावशाली नेते सत्यजितसिंह पाटणकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आजच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन असताना भाजपाने हा राजकीय डाव रचला, हे लक्षणीय ठरत आहे.
सांगलीतील धक्का : वैभव पाटील भाजपच्या वाटेवर
विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील हे देखील लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीतील राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.
आगामी निवडणुकांसाठी आव्हान
या दोन नेत्यांचा भाजप प्रवेश म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवार गटासाठी गंभीर इशारा मानला जात आहे. एकीकडे वर्धापन दिनाचे जल्लोषाचे वातावरण असतानाच दुसरीकडे, पक्षात फुट पडत असल्याने राजकीय अस्थिरतेचे सावट पसरल्याचं चित्र आहे.





