‘ज्या कंत्राटदाराला हे काम दिले होते त्याला…’; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुप्रिया सुळेंनी केली ‘ही’ मागणी

मुंबई – खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडियावर मालवण किल्ल्यावरील दुर्घटनेबाबत पोस्ट करत सरकारला सुनावले आहे. तसेच हा पुतळा उभारण्याचे काम राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवले होते, अशी माहिती सुळे यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमधून दिली आहे. त्यामुळे आता ज्या कंत्राटदाराला हे काम दिले होते. त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzah pic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024
खासदार सुळे यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.
विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही पंतप्रधानांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहे.





