पुणे जिल्हा | यवत येथे सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत

यवत, (वार्ताहर)- खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर असताना दौंड तालुक्यातील जनतेने नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचा दौंड तालुक्यात ठिकठिकाणी जाहीर सत्कार केला.
यामध्ये यवत गावासह भरतगाव, कासुर्डी, लडकतवाडी, नाथाचीवाडी, राहू, पिंपळगाव,खुटबाव भांडगाव, खोर येथील नागरिकांनी यवत येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये डीजे व फटाक्यांचे आतीशबाजी करत जंगी स्वागत केले.
बारामती लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून २४ हजारांचे मताधिक्य घेऊन सुळे यांनी आघाडी घेत सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी नामदेव ताकवणे, सोहेल खान, रामभाऊ टूले, अजित शितोळे, सचिन काळभोर, चैतन्य पाटोळे, आनंद शेलार, डॉ. वंदना मोहिते, मयूर दोरगे, आबासाहेब दोरगे, अरविंद दोरगे, काँग्रेसचे विठ्ठल दोरगे, रयत शेतकरी संघटनेचे बापूसाहेब देशमुख, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.
दौंडची जनता करून दाखवते
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संपूर्ण निवडणूक जनतेने हातात घेतली होती. दौंडच्या जनतेचे शरद पवार यांच्यावर असणारे अतूट प्रेम, विश्वास त्यांनी दिलेल्या मतांच्या आघाडीमधून दिसून येते, हा विजय माझा एकट्याचा नसून दौंड तालुक्यामधील शरद पवार यांच्यावर निष्ठा, प्रेम करणाऱ्या प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्याचा आहे. दौंडची जनता सूज्ञ आहे. काही बोलून दाखवत नाही. ती करून दाखवते, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे करणार उपोषण
रयत शेतकरी संघटनेचे बापूसाहेब देशमुख यांनी दूध दरवाढ, कांद्यासाठी हमीभावाची मागणी केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जर सरकारने दूध दरवाढ व कांद्यासाठी हमीभाव जाहीर केली नाही तर मी व माझ्यासह लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांना दिली.
सातारची जागा कॉपी करून पास
शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर बोलताना सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सातारची जागा ही महत्त्वाची मानली जाते. यासाठी शरद पवार यांची संपूर्ण ताकद पणाला लागली होती. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये तुतारी व पिपाणी चिन्ह होते.
यामुळे लोकांची दिशाभूल झाली. आताच्या उमेदवाराचा विजय म्हणजे कॉपी करून पास झाले असल्याचा टोला सुळे यांनी लगावला. कट्टर शिलेदार शशिकांत शिंदे यांचा विजय व्हायला पाहिजे होता, असे सुळे यांनी आवर्जून नमूद केले.





