पुणे जिल्हा | ताई की वहिनी?

वडापुरी, {विजय शिंदे} – बहुचर्चेत आणि लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया (ताई) सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा (वहिनी) पवार यांच्यातील तुल्यबळ चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीस काही तास उरले असताना निकालावरून सर्वांची धाकधूक वाढली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना कडवे आव्हान दिले आहे. भाजपने आपली सर्व ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी केली असली तरी प्रचारादरम्यान कमालीची चुरस दिसून आल्यामुळे शेवटी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्कंठा इंदापूरच्या कट्ट्या-कट्ट्यांवर, दुकानांच्या फळ्यांवर, मित्र परिवार व नातेवाइकांसह कार्यकर्त्यांमध्ये आहे.
बारामती मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांपैकी चार विधानसभा क्षेत्र महायुतीकडे असताना त्याचा लाभ कितपत सुनेत्रा पवार यांना मिळतो आणि त्या बाजी मारणार का? सुप्रिया सुळे भोर-पुरंदरसह कोणत्या मतदारसंघातून अधिक मताधिक्य घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या लढतीसाठी परस्परविरोधी विजयाचे दावे केले असले तरी त्यात अनेक राजकीय समीकरणे मांडली जात असल्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार ही येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
अजितदादांची धडपड यशस्वी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक वळणे घेत लढली गेलेल्या या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी चुरस असली तरी सुरुवातीला भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात असलेला मतदारांचा अंतःप्रवाह नंतर शेवटच्या टप्प्यात वळविण्यात अजित पवार यांनी केलेली नियोजनबद्ध धडपड किती यशस्वी होणार, याचीही रंगतदार चर्चा जागोजागी ऐकायला मिळत आहे.
भरणे-पाटलांची जोडी जनतेने स्वीकारली?
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे मोठे वर्चस्व आहे. या दोन्ही नेत्यांचे तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.
या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा अजित पवार यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद-पंचायत समिती- नगर परिषद व इतर सहकारी संस्थांवर या दोन्ही नेत्यांचे प्राबल्य आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होताच मतदारांनी पाटील व भरणे या जोडीला एकत्रित स्वीकारले आहे, हे स्पष्ट होणार आहे.
गावगावगाड्याने काय दिवे लावले?
आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भरघोस निधी दिला. मागेल त्या गावात मागील तितका निधी त्यांनी उपलब्ध केला. गावगाड्यातील कार्यकर्त्यांना आमदार भरणे यांनी ताकद दिली; परंतु गाव गाड्यात काय दिवे लावले हे निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार असल्याने कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.





