पुणे जिल्हा | बळीराजा उन्हात, राजकीय कार्यकर्ते एसीत

सासवड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आसुन पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकर्यांना करावा लागत आसला तरी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांकडून कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या आढवा बैठका या एअर कंडिशनर हॉटेलात जेवणाच्या मेजवान्यांसह होत आसल्याने दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार असून समन्वय समिती व आढावा बैठकांचा तडखा जोरदारपणे सुरू आहे. परंतु यात दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यांनकडे मात्र सध्यातरी नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.
चालू वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विभागांत दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. तर दुसरीकडे, सरकारकडून, शेतमाल निर्यात करण्या ऐवजी बेसुमार आयाती सुरू आहेत. यामुळेच शेतमालाला भाव मिळत नसून शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहेत.
आगोदर दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत, शेतकरीवर्ग शेतातील शेतमाल टँकरच्या पाण्यावर जगविण्यासाठी धडपडत आहेत. तर दुसरीकडे राज्य करते व शासकीय अधिकारी हे निवडणुकीत गुंतल्याने शेतकर्यांना वार्यावर सोडल्याचे पहावयास मिळते.
नेते आवाज उठवणार का?
पुरंदर तालुक्याच्या सर्व गावांमध्ये गेल्या पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाली होती. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुधन सांभाळणार्या शेतकर्यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे चारा मिळेल का चारा ? याबाबत शोधाशोध सुरू आहे.
तर पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने दुष्काळाची दाहकात दिसून येत असून याकडे तालुक्यातील राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते आवाज उठवतील काम् ते येणार्या काळात समजेल.





