Supriya Sule : महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करणार का?, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मुद्दा अन् कृषिमंत्र्यांचं उत्तर

Supriya Sule : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील एक मंत्री आणि आमदाराने राज्याच्या कृषी विभागात पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी चौकशी करून जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करणार, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते का? आणि या घोटाळ्याचे चाैकशीचे आदेश आपण देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
तर दोषींवर कठोर कारवाई करणार : शिवराज सिंह चौहान
लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या या आरोपावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी हे पहिल्यांदाच ऐकत आहे. मला सत्य काय आहे माहिती नाही. मात्र, जर खरंच भ्रष्टाचार झाल्याचे आढळले, तर दोषींवर कठोर कारवाई करणार असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिलं. तसेच दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आतापर्यंत २३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. तर उर्वरित राज्यांनी ही योजना स्वीकारलेली नाही. आम्ही त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे फायदो सांगून योजना लागू करण्यास सांगितले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केला होणं भ्रष्टाचाराचा आरोप
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमध्ये पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, पीक विमा योजनेंतर्गत १०५ कोटी रुपये बनावट खात्यांवर पाठवण्यात आले. तसेच डीबीटी योजना बंद केली गेली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या टीमने दीडशे ते दोनशे नावांवर निधी लाटला. मंत्रीही या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.





