प्रभात वृत्तसेवा पुणे – उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची १५ मते फुटल्याच्या बातम्या निराधार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.याबाबत बोलताना सुळे यांनी सांगितले की, मतदान गुप्त असताना तसेच मतपत्रिका सर्वांना एकसमान असताना भाजपला क्रॉस व्होटिंग झाल्याचे कसे कळले? कोणी कोणाला मतदान केले आहे, याची माहिती जर भाजपला असेल तर ही बाब गंभीर असून आता राष्ट्रपतींना पत्र लिहून यात काहीतरी गोलमाल आहे का? याची चौकशी करण्यासंदर्भात मागणी करणार आहे. जनसुरक्षा कायद्याविरोधात केलेल्या आंदोलनानंतर खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या क्रॉस व्होटिंगच्या मुद्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, संजय जैस्वाल यांच्या ४० मतांच्या दाव्यावर शंका व्यक्त होत आहे. वायएसआर काँग्रेस कधीही इंडिया आघाडीसोबत नव्हते. तो पक्ष भाजपसोबत कधी असतो, कधी नसतो, हे त्यांच्या सोयीनुसार ठरते. महाराष्ट्रातील मते फुटली असे सांगून सत्ताधारी मविआला या प्रकरणात विनाकारण बदनाम केले जात आहे. १४ क्रॉस व्हेटिंग झाले तर कुठल्या राज्यातील झाले?” असा प्रश्न त्यांनी विचारला. सत्तेसाठी मराठी माणसाला बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.जनसुरक्षा कायद्याबाबत विचारले त्या म्हणाल्या की, जनसुरक्षा कायदा आणला तेव्हापासूनच याला विरोध आहे. आम्ही या संदर्भात अनेक सूचना केल्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.सोलापूर येथील महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या प्रकरणावर त्या म्हणाल्या, या महिला अधिकारी गुणवत्तेवर पास झालेल्या आहेत आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत. ‘डिग्री दाखव’ असे म्हणणे म्हणजे यूपीएससीलाच आव्हान देण्यासारखे आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. जर प्रामाणिक अधिकाऱ्यांना असा त्रास झाला तर आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.