Supriya Sule : अशा लोकांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येऊ देणार नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण होते, हे सर्व समोर आले आहे. त्यांच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. असे असताना त्यांना क्लीनचीट कसे देता हा प्रश्न आहे, अशा लोकांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, अशी भूमिका शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी मांडली.
कृषी विभागातील घोटाळ्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातून मुंडे यांना क्लीनचीट मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्या प्रश्नांवर सुळे यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झाले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्याचवेळी कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता.
आता त्यांना राजीनामा देण्याचे सांगावे लागत आहे. स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्रपक्षांवरही मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
लाडकी बहीण योजनेची चौकशी करावी
लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पुरुषांनी अर्ज कसे भरले, यातील एजन्सी कुणाकडे त्याची चौकशी करावी. निवडणुकीच्या आधी घाईघाईने जास्तीत जास्त अर्ज भरून घेतले. यामागे मोठे षडयंत्र आहे. ज्या कंपनीने अर्ज भरून घेतले त्यांची चौकशी करा. एवढेच नव्हे एसआयटी आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.





