Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिला पुन्हा एकदा अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. यूपीएससीच्या फसवणूकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकेच्या अंतरिम संरक्षणात २१ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात निवेदन दाखल केले. दिल्ली सरकारने दाखल केलेल्या उत्तरात खेडकरने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, ते रेकॉर्डवर घेण्यात आले नाही, असे वकिलांनी निवेदनात म्हटले. खंडपीठाने या निवेदनाची दखल घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला खेडकरचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे की नाही हे पडताळण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांनी विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरवरील आरोपांची दिल्ली पोलिसांना लवकर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. खेडकरने स्वतः शपथपत्रावर सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बनावट कागदपत्रांच्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यावर खंडपीठाने बनावट प्रमाणपत्रे मिळविलेला स्रोत उघड करणं आवश्यक असल्याचे म्हटले. परंतु त्यासाठी खेडकरला पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देत तपासात सहकार्य करण्यास सांगितले. काय आहे संपूर्ण प्रकरण? पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. जून 2024 महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या, त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला आणि महाराष्ट्र सरकारचं चिन्ह लावलं होतं. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. यानंतर हा वाद वाढत गेल्याने पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. आता या प्रकरणात मोठे खुलासे झाल्याने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.