नगर जिल्ह्यात 57 हजार शेतकऱ्यांचे झाले आधार लिंक

कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास झाली सुरुवात
नगर – महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत नगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातील आज दुपारपर्यंत 57 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आलेले आहेत. आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या बेँक खात्यात पुढील 72 तासांत कर्जाची रक्कम जमा होणार आहे.
राज्यभरात कर्जमाफीचा विषय सुरू झालेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दोन लाख 52 हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम सुरु करण्यात आले असून आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सोसायटी, तसेच जिल्ह्यात बॅंकेच्या शाखेमध्ये गर्दी पाहायला मिळत होती.
ज्या वृद्धांना किंवा अपंगांना त्या ठिकाणी येता येत नाही अशा ठिकाणी बॅंकेच्या तसेच सरकारच्या वतीने त्याच्या घरी जाऊन त्यांच्या आधार प्रमाणित करून घेण्यात आले.
अकोले तालुक्यातील कळस येथील शेतकऱ्यांच्याकडे जाऊन काल रात्री नऊच्या सुमाराला त्यांनी आधार प्रमाणित करून घेतले आहे. नगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी ब्राह्मणी व जखणगाव या गावातील 972 शेतकऱ्यांचा पहिल्या प्रातिनिधीक यादीत समावेश होता.
त्यानंतर दुसरी यादी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये नगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. आज दुपारपर्यंत 57 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच रक्कमही जमा होणार आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे याअगोदर पावणे पाच कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. आज साधारणता त्यामध्ये वाढ होऊन तो 50 कोटीच्या घरांमध्ये गेलेला आहे.
7 हजार 853 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झाल्यानंतर बॅंकेला 53 कोटी रुपये जमा झाली असल्याची माहिती जिल्हा सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर आधार प्रमाणित करण्याचे काम सुरू झाले असून काल सुट्टीच्या दिवशी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे काम सुरू ठेवले. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.





