#WomensT20Challenge : ट्रेलब्लेझर्सला मानधनाने सावरले

शारजा – महिलांच्या चॅलेंज मिनी आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाला 118 धावाच करता आल्या. त्यातही प्रमुख फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार स्मृती मानधनाने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे त्यांना 20 षटकांत 8 बाद 118 धावांपर्यंत मजल मारता आली. सुपरनोव्हाजची अव्वल गोलंदाज राधा यादवने पाच गडी बाद करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
नाणेफेक जिंकत सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीतने ट्रेलब्लेझर्सला प्रथम फलंदाजी दिली. तिचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार मानधनाने दीएन्द्रा डॉटिनच्या साथील संघाला 71 धावांची सलामी दिली. तेव्हा ते मोठी धावसंख्या उभारतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, डॉटिन बाद झाल्यावर त्यांच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहतानाही अपयश येत होते.
रिचा घोषने काही काळ किल्ला लढवला. मात्र, तीदेखील आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली. दरम्यान, मानधनाने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली व संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तिने दमदार अर्धशतकी खेळी केली, पण तिला अन्य फलंदाजांनी साथ दिली नाही. तिने आपल्या 68 धावांच्या खेळीत 49 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकारांची बरसात केली.
दीप्ती शर्मा, सोफिया एक्केलस्टोन, हरलिन देओल यांनी साफ निराशा केली. पहिल्या तीन फलंदाजांव्यतिरिक्त ट्रेलब्लेझर्सच्या सहा फलंदाजांना दोन अंकी धावाही करता आल्या नाहीत. सुपरनोव्हाजकडून राधा यादवने पाच गडी बाद करण्याची किमया केली. तिला साथ देताना पूनम यादव व शशिकला सिरीवर्धने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या स्पर्धेचे सलग तिसरे विजेतेपद मिळवताना हॅट्ट्रिक साधण्याची ट्रेलब्लेझर्सला संधी होती. मात्र, त्यांच्या फलंदाजांनी निराशा केल्याने या स्पर्धेला यंदा सुपरनोव्हाजच्या रूपाने नवा विजेता मिळणार हे पहिल्या डावातच निश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले.
मानधना वगळता ट्रेलब्लेझर्सच्या एकाही फलंदाजाने हा अंतिम सामना असूनही जबाबदारीने खेळ केला नाही. त्यांना राधा यादवच्या गोलंदाजीचा सामनाच करता आला नाही व त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 118 धावांवर रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक – ट्रेलब्लेझर्स – 20 षटकांत 8 बाद 118 धावा. (स्मृती मानधना 68, दीएन्द्रा डॉटिन 20, रिचा घोष 10, राधा यादव 5-16, शशिकला सिरीवर्धने 1-22, पूनम यादव 1-23).





