Sunny Leone: सनी लियोनीचा खुलासा : सरोगेट आईनं घेतलेले पैसे वापरून घर बांधलं आणि लग्नही केलं

Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीनं नुकताच आपल्या सरोगेसीच्या अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सरोगेट आईला इतकी मोठी रक्कम मिळाली की तिनं त्या पैशातून स्वतःचं घर बांधलं आणि लग्नाचाही खर्च केला. हा खुलासा सनी आपल्या आगामी पॉडकास्ट ‘ऑल अबाउट हर’ मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत करताना दिसणार आहे.
सनी लियोनी आणि डॅनियल वेबर यांना तीन मुलं आहेत. २०१७ मध्ये त्यांनी मुलगी निशा हिला दत्तक घेतलं, तर २०१८ मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून जुळी मुलं नूह आणि अशर यांचा जन्म झाला. सनी म्हणाली, “आम्ही सरोगेट आईला आठवड्याला फी देत होतो. इतकंच नव्हे तर तिच्या नवऱ्याला देखील सुट्टीसाठी पैसे मिळाले. सरोगेसीसाठी आम्ही खूप मोठी रक्कम खर्च केली.” त्या पैशांचा उपयोग सरोगेट आईनं घर खरेदी करण्यासाठी आणि लग्नासाठी केला.
सोहा अली खाननं सनीला विचारलं की तिनं सरोगेसीची निवड जाणूनबुजून केली का, कारण तिला स्वतः आई व्हायचं नव्हतं का? यावर सनीनं स्पष्ट केलं की, “असं अजिबात नव्हतं.” याच संभाषणात सनीनं दत्तक प्रक्रियेबद्दल सांगितलं की, ज्या दिवशी आयव्हीएफची प्रक्रिया झाली, त्याच दिवशी त्यांना मुलगी निशाही मिळाली.
२०११ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या सनी आणि डॅनियलनं मुलांसोबतचं आयुष्य अनेकदा सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वाढदिवस असो, सुट्टी असो किंवा कौटुंबिक क्षण, सनी चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याची झलक दाखवत असते. आता सरोगेसीबद्दलचा तिचा हा खुलासा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




