Sunny Leone: सरकारी योजनेंतर्गत सनी लिओनीला महिन्याला मिळतायत 1 हजार रुपये? नक्की प्रकरण काय? वाचा

Mahtari Vandan Yojana : प्रत्येक राज्यामध्ये कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू आहे. महिला असो वा वृद्ध प्रत्येकाला सरकारी योजनेंतर्गत ठराविक रक्कम देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र, काहीजण या योजनेांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे समोर आले आहे.
बनावट नावे, कागदपत्रे वापरून सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मात्र, छत्तीसगडमध्ये चक्क अभिनेत्री सनी लिओनीचे नाव वापरून एक व्यक्ती सरकारी योजनेंतर्गत महिन्याला 1 हजार रुपये घेत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नक्की प्रकरण काय?
छत्तीसगड सरकारद्वारे महिलांसाठी ‘महतारी वंदन योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिन्याला प्रत्येकी 1 हजार रुपये दिले जातात. मात्र, काहीजणांकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर केला जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सनी लिओनीच्या नावाने ऑनलाइन खाते उघडण्यात आले होते. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये व्यक्तीचे नाव सनी लिओन आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. तसेच, या व्यक्तीच्या खात्यात दरमहिन्याला रक्कम देखील जमा करण्यात आली. ही माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसकडून राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधत योजनेंतर्गत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
बनावट पद्धतीने लाभ घेणाऱ्या व्यक्तीवर कारवाई?
हे प्रकरण समोर आल्यानंतर बस्तरचे जिल्हाधिकारी हरिस एस यांनी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अंतर्गत तालूर गावातील अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्या आयडीने खाते उघडण्यात आल्याचे समोर आले. तसेच, वीरेंद्र जोशी नावाची व्यक्ती चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली.
यानंतर आता व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. तसेच, व्यक्तीचे बँक खाते गोठवून वसूली केली जात आहे. दरम्यान, छत्तीसगड सरकारद्वारे फेब्रुवारी 2024 ला या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. जवळपास 70 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.




