तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारा सनी काकडे जेरबंद

कोरेगाव (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून या कालावधीत कोरेगावात वास्तव्य करणाऱ्या सनी राजू काकडे (रा. गोसावी वस्ती, कोरेगाव) याला परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली आहे.
त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी काकडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कालावधीत तो कोरेगावच्या गोसावी वस्तीत ये-जा करत होता.
गेल्या काही दिवसांपासून तो तेथे रहात होते. याबाबतची माहिती रितू खोखर यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचारी सनी आवटे, प्रमोद जाधव, हेमंत शिंदे, संतोष जाधव व अश्विनी पवार यांनी सनी काकडेचा माग काढला.
तो जुना मोटार स्टॅंडच्या पिछाडीस महादेवनगरात एका बिअर बारजवळ आला असता, या पथकाने त्याला पकडले. याप्रकरणी प्रमोद जाधव यांनी तक्रार नोंदवली असून हवालदार सुधीर खुडे तपास करत आहेत.





