Pune District : पालखी तळावरील झाडांना उन्हाची झळ; तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी

वाल्हे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटचे मुक्कामी ठिकाण असलेल्या, वाल्हेनजिक सुकलवाडी फाट्यानजीक (ता.पुरंदर) असलेल्या ओसाड माळरानावर पालखी सोहळा मागील दहा वर्षांपासून विसावत आहे. या ओसाड माळरानावर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत वाल्हे, सुकलवाडी, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून, या पालखी मैदानातील वृक्षांना सद्यःस्थितीत उन्हाच्या झळांमुळे पाण्याची नितांत गरज आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात टँकर सुरू करण्याची मागणी वृक्ष संवर्धन ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.
सुकलवाडी फाट्यानजिक शासकीय मालकीचा असलेल्या भव्य पालखी तळ मागील काही वर्षांपासून,पालखीतळ सुशोभीकरणातून,भव्य पालखी मैदानास सीमा भिंत,दोन स्वागत कमानी, हायमास्ट दिवे, पालखी विसावा ओटा आदी कामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र,अत्यावश्यक असलेल्या पाण्याची सोय शासनाकडून अद्यापपर्यंत करण्यात आली नाही.
येथे संपूर्ण ओसाड माळरान होते; या माळावर पावसाळा संपल्यानंतर फक्त वाळलेले गवत दिसत होते.या भव्य पालखी मैदान परिसरात विविध संस्था, तसेच ‘हरितवारी उपक्रमांतर्गत’ आळंदी देवस्थान, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराई संस्था, बाणेर येथील वसुंधरा अभियान, तसेच प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर मित्र परिवार, वाल्हे ग्रामपंचायत, सुकलवाडी ग्रामपंचायत, वृक्षसंवर्धन गृप वाल्हे, विविध पक्षातील नेते, उद्योजक राहुल दादा यादव युवा मंच, तसेच स्थानिक युवक, यांच्या वतीने येथील पालखी मैदानामध्ये, जवळपास ४०० – ४५० विविध प्रकारची झाडे पालखी तळ हरित करण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, नादुरकी, जांभूळ, करंज, आपटा, गुलमोहर आदी प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आली असून, त्या झाडांची निगा राखणे गरजेचे असताना मात्र याकडे,अनेक नेते, विविध संस्था दुर्लक्ष करीत आहेत.
दरम्यान, मागील सहा वर्षांपासून,पावसाळा संपल्यानंतर झाडांचे संगोपन करताना या झाडांना पाण्याची अडचण निर्माण झाली होती. यावेळी, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून,तसेच वाल्हे ग्रामपंचाय, सुकलवाडी ग्रामपंचायत व श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांनी तोडगा काढून,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दर गुरुवारी दोन टँकरच्या माध्यमातून, या झाडांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली होती.
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक पडला होता. यानंतर ऑक्टोबर महिन्यांतही पाऊस पडला होता.यावर्ती या पालखी मैदानावरील झाडे अद्यापपर्यंत तग धरून राहिली होती; डोंगर परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत आटले असल्याने,जमिनीतील पाणीपातळीत घट झाली आहे.सद्यःस्थित थंडी सुरू असून,उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असल्याने,येथील झाडांना त्वरित पाणी उपलब्ध होणे गरजेचे असल्याने त्वरित टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी,वृक्ष संवर्धन गृपचे सदस्य,अमोल दुर्गाडे,महेश भुजबळ, महेंद्र भुजबळ,योगेश दुर्गाडे,पवन दुर्गाडे,संतोष दुर्गाडे,सागर दुर्गाडे,आकाश जगताप,सनी दुर्गाडे आदींनी केली आहे.
पालखी मैदानावरील झाडांना त्वरित दोन टँकर सुरू करण्यात यावेत,अशी मागणी करणारे निवेदन,श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले असून, हे निवेदन दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्याकडे देण्यात येणार असून,तात्पुरत्या स्वरूपात दोन टँकर सुरू करण्यात येतील”.
-अतुल गायकवाड,सरपंच, वाल्हे





