Sunil Tingre: भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचा खुलासा
Sunil Tingre: पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. याशिवाय पक्षाची अधिकृत भूमिका आणि आगामी राजकीय दिशा याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष तथा माजी आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्ट केले.
शहरातील एका माजी खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी महापालिकेत भाजपसोबत जाण्यास तयार असून, त्यांना उपमहापौरपद हवे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. महापालिकेचे विरोधीपक्ष नेते नीलेश निकम, माजी महापौर दत्ता धनकवडे या वेळी उपस्थित होते.
टिंगरे म्हणाले, की सध्या आम्ही महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून ठामपणे काम करत आहोत. पुणेकरांनी आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याची संधी दिली असून, नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम सुरू आहे.
कोणत्याही राजकीय निर्णयाबाबत किंवा आघाडीबाबत अद्याप पक्षामध्ये चर्चा झालेली नाही. आजच्या घडीला कोणताही निर्णय झालेला नाही. जो काही निर्णय होईल, तो पक्षश्रेष्ठी घेतील. कोणताही प्रस्ताव आल्यास पक्षाच्या पातळीवर त्यावर विचार करण्यात येईल, असा खुलासाही टिंगरे यांनी केला आहे.





