NCP News : सुनील तटकरेंना मोठा धक्का; कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
NCP News : रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

NCP News : रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुनील तटकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही नेत्यांसह माणगाव नगरपंचायतीतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (NCP News)
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे माणगावमधील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे, भाग्यश्री यादव आणि माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (NCP News)
माणगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याचा निर्धार
या पक्षप्रवेशानंतर आगामी नगरपंचायत निवडणुकीत माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. (NCP News)
महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका
या वेळी आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठ्या घडामोडी घडतील आणि कोकणातील काही बडे नेते पक्ष सोडतील, असा दावा दळवी यांनी केला. (NCP News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानांवरूनही दळवी यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत, अशा नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा सल्लाही त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना दिला. (NCP News)
“आता आमचा गिअर बदलला आहे. राजकारणात गिअर बदलावा लागतो. भरत गोगावले यांनी गिअर बदलला नाही, तर आम्ही नक्कीच गिअर बदलू,” असे विधान दळवी यांनी केले. (NCP News)
माणगावमधून पक्षप्रवेशाची सुरुवात करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या घडामोडींचा आगामी नगरपंचायत निवडणुकीवर आणि रायगडमधील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (NCP News)





