सुनील कांबळेंनी मतदारसंघाचा कायापालट केला; गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान

पुणे – महाराष्ट्रात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे डबल इंजिन सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील. पुण्यात महायुतीच्या काळात अनेक विकासकामे झाली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमधील आमदार सुनील कांबळे यांनी विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघांचा कायापालट केला.
अनेक वर्षे रखडलेले लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे हे स्मारक पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांना केले.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसागर हॉल येथे महाबैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी डॉ. बाळासाहेब हरपाळे, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. गणेश परदेशी, तसेच कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, सरचिटणीस, माजी नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, मी खासकरून डॉक्टर्स, इंजिनिअर यांना भेटतोय. महायुतीच्या सर्व उमेदवारांबद्दल, महायुतीच्या कामाबद्दल त्यांना माहिती आहे. काँग्रेसने ६० वर्षांत केलेले काम आणि आम्ही केलेले दहा वर्षांतील काम यातील फरक लोकांसमोर मांडतोय. त्यामुळे प्रत्येकाला विनंती करतोय, की आमचे स्थानिक उमेदवार चांगले काम करत आहेत, त्यांना परत एकदा निवडून द्यावे.
मागील पाच वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा प्रश्न मला मार्गी लावता आला, याचा आनंद असल्याच्या भावना आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केल्या.





