अखेर ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी, म्हणाला…

मुंबई – टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे भारतातील प्रत्येक सामान्य माणूस चिंतेत असताना, बॉलीवूड कलाकार देखील यापासून सुटलेले नाहीत. यावरून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने एक वादग्रस्त विधान केले होते. टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आम्ही टोमॅटो कमी खात आहोत. असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शेतकऱ्यांनीही सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व वादानंतर सुनील शेट्टीने माफी मागितली आहे.
“शेतकरी हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझे हॉटेल्स असल्याने नेहमीच त्यांच्याशी माझा थेट संबंध राहिलेला आहे. मी खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचं समर्थन करतो. त्यांच्याबद्दल नकारात्मक भावना बाळगण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी नेहमीच त्यांच्या पाठिंब्याने काम केले आहे. मला आपल्या देशी उत्पादनांचा प्रचार करायचा आहे. आपल्या शेतकऱ्यांना त्याचा नेहमीच फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचा विचार मी माझ्या स्वप्नातही करू शकत नाही. कृपया माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका. या विषयावर मी आता अधिक काही बोलू शकत नाही,” असे सुनील शेट्टी म्हणाला.
टोमॅटो भाव वाढीवर नेमकं सुनील शेट्टी काय म्हणाला होता?
मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, “माझी पत्नी माना शेट्टी ताजे फळे किंवा भाज्या खरेदी करते. आमचा ताज्या पिकांवर विश्वास आहे. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्यामुळे या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण ते खरे नाही, अशा समस्यांना आम्हाला देखील तोंड द्यावे लागते.
यावेळी सुनील शेट्टीने एका सोशल मीडिया अॅपवरून फळे आणि भाज्या खरेदी केल्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी एका अॅपवरून भाज्या किंवा फळे ऑर्डर करतो, परंतु ते स्वस्त आहे म्हणून नाही, तर ते ताजे पदार्थ विकतात म्हणून… मी देखील एक रेस्टॉरंट मालक आहे आणि मी नेहमीच चांगल्यासाठी सौदेबाजी केली आहे. पण टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे इतरांप्रमाणे मलाही चव आणि दर्जाबाबत तडजोड करावी लागत आहे.’
सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये – रविकांत तुपकर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले होते की, “टोमॅटोचे भाव वाढले म्हणून इंटरनॅशनल विषय करणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही. तुमच्या मालकीच्या हॉटेलमधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का? सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते..’ रविकांत तुपकर म्हणाले.





