राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; कार्यकर्त्यांचा जल्लोष

बारामती – राज्यसभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच बारामतीत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर बारामती मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात निरुउत्साहाचे वातावरण होते. मात्र आता सुनेत्र पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल होताच बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, माजी नगरसेवक अभिजीत जाधव, माजी नगरसेवक नवनाथ बल्लाळ, शहरी युवक अध्यक्ष अविनाश बांदल, अभिजीत काळे, नवनाथ मलगुंडे, प्रताप पागळे, विशाल जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





